दोन जीवांचे घरकुल होते प्रेमाने ते भिजलेले
दोघे होते दोघांसाठी प्रेम तयांनी जपलेले
या प्रेमाच्या वेलीवरती फूल उमलले गोड असे
दोघांचे मग तीन जाहले नवीन विश्व सुूरु जसे
काळ धावला वेगाने दाखविला त्याने रंग नवा
अंतर आले दोघांमधे स्पर्श हरविला हवा हवा
तो रमला बाहेरी कोठे हरवुनी सगळे पाश जुने
आता काही उरले नाही सगळे झाले रीते मुके
एके दिवशी वदला तो तिज सांगायाचे काही तुला
वेगवेगळे राहू आता थांबवू सगळा खेळ पुरा
ढासळुनि गेली ती ऐकून समोर नुसता अंधार
काय म्हणावे कळले ना तिज लागे जीवाला हा घोर
सावरुनि काही दिवसांनी तिने घातला हा मेळ
इच्छा तुझी पूर्णच होईल थांबणार आहे खेळ
फक्त थांब तू एकच मास भरून घेईन नजरेत
रोज एकदा उचालूनि घ्यावे मजला बाहुपाशात
इच्छा तिची ही पूर्ण कराया दिली मान्यता त्यानेही
उचलुनि घेताना तिजला मग बोलू लागले नयनांनी
सैल असे जी पकड आधी ती घट्ट व्हावया लागली
रुक्ष अशा त्या जगण्याला मग नवी पालवी मोहरली
जाणवू लागे त्याला आता ,बाग जी होती फुललेली
फुलपाखरापरी होती जी ,आज कशी ही कोमेजली
आठवले ते दिवस आणिक ,आठवल्या त्या रात्रिहि
साठवून घेता घेता, बोलू लागल्या गात्रीही
दुसऱ्या दिवशी येताना गजरा आणिला त्याने तिजला
विसरून सगळे स्वीकारले मनोमानी त्याने तिजला
परि तिला बघुनी पडलेले तर्क तयाने बहु केले
गलबलून गेला जेव्हा कळले गेली ती कर्काने
काय जाहले कळले नाही आता फक्त उरली आस
आठवले त्याला तेव्हा का मागितला होता तो मास
आठवणीतून आता तिजला आठवायचे बघ उरले
नात्यांचा ओलवा देऊन काळीज माझे ते नेले